आनंदाची मोजपट्टी 

लेखिका: अश्विनी मोकाशी ©

प्रत्येक वर्षी 20 मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिन’ साजरा केला जातो. कोरोनाव्हायरस, कर्फ्यू आणि सामाजिक अंतर, घरातून नोकरी करणे किंवा घरून शाळा शिकणे, अशा सद्य परिस्थितीत आनंदी राहणे फारच अनाकलनीय आणि अशक्य कोटीतील गोष्ट वाटत आहे. परंतु कदाचित ही समस्या आपल्याला काही प्रमाणात सोडवता येईल. आपल्याला भगवद्गीतेतील आणि स्टोइझीझममध्ये सांगितलेली आनंदाची संकल्पना माहित असेल, तर आपल्याला या परिस्थितीतदेखील स्वतःला संतुलित, समतोल आणि त्यानुसार आनंदी कसे ठेवता येईल, याचे समाधान मिळेल. या समस्येचे समाधान आणि उत्तर आपण आनंद कसा मोजतो, त्यासाठी कोणता कस लावतो आणि कुठली मोजपट्टी वापरतो, यामध्ये सामावलेले आहे.

आनंद कसा मोजावा

आपण वारंवार हा शब्दप्रयोग वापरतो की आपल्याला आज कसे वाटत आहे, आपण आज खूष आहोत की नाखूष आहोत.  भागवद्गीतेत सांगितलेल्या किंवा स्टोईक तत्त्वज्ञांनी ठरवलेल्या अटी जर आपण विचारात घेतल्या आणि त्यांनी मांडलेले आनंदाचे निकष आपण मानले तर, आपल्याला त्याची मोजपट्टी (scale) खालीलप्रमाणे दिसेल.  या मोजमापात १ म्हणजे कमीतकमी आनंदी आणि ५ म्हणजे सर्वात आनंदी, असे समजावे:

1. प्रचंड नाखूष
2. काहीसे नाखूष
3. संतुलित
4. काहीसे आनंदी
5. प्रचंड आनंदी 

‘प्रचंड नाखूष’ असण्याची पहिली अवस्था म्हणजे दुःखाने ग्रस्त असणे. उदाहरणार्थ, एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणे किंवा दिवाळखोरी येणे, अशा मोठ्याप्रमाणात झालेल्या नुकसानाचा सामना करावा लागल्याने भावनिक ओझे सहन न होणे, आणि परिणामी कार्य करण्यास सक्षम नसणे आणि निष्क्रिय होणे. 

‘काहीसे नाखूष’ होण्याची दुसरी अवस्था म्हणजे चिडचिडेपणा, रागावणे, एखाद्याशी भांडणतंटा झाल्याने किंवा एखादी गोष्ट बिघडल्याने आनंदी न होण्याची स्थिती होय. काही उदाहरणे अशी असतील की आपला फोन किंवा काही सॉफ्टवेअर खराब झाले आहे, किंवा कामावर खराब अभिप्राय मिळत आहे किंवा कुणीतरी सतत टीका करत आहे.

‘संतुलित’ होण्याची तिसरी अवस्था म्हणजे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आपली रोजची कामे करत राहणे आणि आपल्या  कामात कुठलाही अडथळा न आणता, आपले कर्तव्य पार पाडण्याची स्थिती.

‘काहीसे आनंदी’ होण्याची चौथी अवस्था म्हणजे एखाद्या घटनेबद्दल उत्सुक असणे, एखाद्याला पाहण्याची उत्सुकतेने वाट पाहणे, एखाद्या फायद्याच्या बातमीची अपेक्षा करणे, आणि चांगल्या मनःस्थितीत असण्याची स्थिती.

‘प्रचंड आनंदी’ असण्याची पाचवी अवस्था क्वचित अनुभवास येते. उदाहरणार्थ आपल्या बाळाचा जन्म, प्रथम मिळालेली नोकरी, प्रेमात पडणे आणि प्रेमाला प्रतिसाद मिळणे,  बेरोजगार असताना मोठी लॉटरी लागणे. अशी आनंदाची स्थिती आयुष्यात काही वेळेलाच अनुभवास येते. 

आपली आनंदाची व्याख्या

जेव्हा आपण म्हणतो की आज आपण इतके आनंदी नाही, तेव्हा आपण मुळात स्वतःला असे म्हणत असतो की आनंदी असणे म्हणजे काय, याची माझ्याकडे एक व्याख्या आहे आणि ती व्याख्या माझ्या सद्य परिस्थितीत किंवा माझ्या सध्याच्या मनाच्या स्थितीनुसार जुळत नाही. म्हणून, मी आनंदी नाही. हा निष्कर्ष एखाद्याला अजून जास्त दु: खी करतो. तर, आनंदी असण्याची आपली व्याख्या काय आहे, आपण वरील अनुक्रमानुसार कुठल्या स्थानावर असायला हवे – म्हणजे तिसऱ्या, चौथ्या की पाचव्या स्थानावर असावे, याचा विचार करतो.  आपली सध्याची मानसिक स्थिती आणि आपल्या आनंदाची व्याख्या का जुळत नाही, याची अनेक कारणे असू शकतात. कदाचित आपण चांगल्या बातमीची अपेक्षा करत असू, पण ती लवकर मिळत नाहीये. कदाचित आपली अपेक्षा असेल की ही वाईट परिस्थिती लवकर निघून जाईल, पण तसे होत नाहीये. कदाचित आपली चिडचिड होत असेल आणि ती चिडचिड आपोआप नाहीशी होत नाहीये. तर्कशुद्ध पद्धतीने बघितल्यास आपल्याला उत्तर मिळेल की, आपली मानसिक स्थिती आणि आपली सद्य परिस्थिती एकमेकांस संलग्न करणे किंवा आपली आनंदाची व्याख्या बदलणे. उदाहरणार्थ, आपल्याला कोणत्या पातळीवरील आनंद पाहिजे, याची व्याख्या आपण बदलू शकतो किंवा आपली सध्याची मानसिक स्थिती ठीक आहे, असे समजू शकतो. गीतेत सांगितलेली आनंदाची स्थिती ही मनाची स्थिर स्थिती म्हणून ओळखली जाते. अशा स्थितीत सुखदुःख किंवा नफा-तोटा दोन्ही समान असते. अशा व्यक्तीला दुःख पचवायची किंवा सुखात वाहून न जाण्याची गुरुकिल्ली सापडलेली असते. त्यांची आनंदाची स्थिती आणि अनुभूती, प्रासंगिक बदल सोडल्यास, चिरकाल टिकणारी असते. 

आता गीता आणि स्टोइक तत्त्वज्ञ यांची दोघांची व्याख्या एकच आहे. सुखी माणूस हा संतुलित मनःस्थितीत, आपल्या मोजपट्टीप्रमाणे # ३ च्या स्थानावर असतो. जर आपण वेळोवेळी  # १ किंवा # ५ वर असाल तर आपण स्थिर नाही. त्याची करणे वेगळी असू शकतील, उदाहरणार्थ काही तोट्यामुळे किंवा कुणाला गमावल्यामुळे आपण दु: खी आहोत किंवा काही लॉटरी जिंकल्याबद्दल आपण आनंदाच्या शिखरावर आहोत. या घटना आपल्या आयुष्यात क्वचित घडतात. कधीकधी त्या अगदी कमी कालावधीत देखील घडू शकतात, परंतु जर शंभर वर्षांचे आयुष्य मोजले आणि एखाद्याच्या जीवनातील मोठे नुकसान किंवा त्याचे मोठे फायदे पाहिले, तर सांख्यिक दृष्टिकोनातून या अशा मोठ्या घटना दररोज, दरमहा किंवा प्रत्येक वर्षीपण होत नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर, आपल्या आयुष्यात फक्त दोनदा आपले आईवडील आपण गमावतो किंवा एखाद्याला दोन मुलं आहेत असे मानले, तर मुलांच्या जन्माचा होणार आनंदपण दोन वेळेलाच होतो. म्हणूनच प्रचंड आनंद किंवा प्रचंड दुःख झाले, तर ते शंभर वर्षाच्या कालावधीत केवळ दोनदोन वेळाच होईल. शिवाय मृत्यू अटळ आहे, या न्यायाने ते दुःख सहन करण्याची ताकद मिळते. त्याप्रमाणेच लक्ष्मी चंचल असते, म्हणून पैसे येणे किंवा जाणे हे अपरिहार्य आहे, म्हणून आपण आश्चर्यचकित होत नाही.

सद्यस्थितीत सामाजिक अंतर राखून, घरी राहून काम करून, जर आपण आपले दैनंदिन जीवन चालू ठेवण्याचे धैर्य वाढवू शकलो, आणि वाईट बातमी अपरिहार्य समजून सुरक्षित राहिल्याबद्दल कृतज्ञता बाळगू शकलो, तर हे संतुलित राहण्याचे लक्षण आहे आणि त्यात आनंद आहे. हा विचार आपल्या आयुष्यात समाधानी राहण्यास मदत करेल आणि परिस्थितीवर मात करायला मदत करेल. 

काळजी घ्या आणि संतुलित रहा!

Photo by Marina on Pexels.com

2 thoughts on “आनंदाची मोजपट्टी ”

  1. वंदना गोखले....आत्ताची मृणाल काणे

    खूप छान खरे आहे बहुतेक लोक १,२,४,५ याच गटात मोडतात पण मला तुला सांगायला आवडेल की मी ३ नंबर गटात आहे.गीता व दासबोध यामुळे

  2. कोकाटे राजेंद्र शिवदास

    मी,३व४मध्ये मोडतो.
    पण खूपच छानमाहितीआहे.
    असा प्रयत्न कोणी करत नाही आनंद मोजण्यासाठीचा.पण या निमित्ताने विचारकेलाजातोय.

Leave a Reply