आर्किलोचस , (इ.स.पू. 650, पारोस [सायक्लेडिस, ग्रीस]), हे एक कवी आणि सैनिक होते. हे इम्बिक, एलिगिएक आणि वैयक्तिक लय कविता यांचे प्राचीन ग्रीक लेखक होते. त्यांचे लिखाण अत्यंत उत्तम प्रतीचे असून काळाच्या ओघात काही प्रमाणात अजून टिकून राहिले आहे. फार क्वचित कोणी कवी आणि सैनिक असलेले आढळतात. अर्चिलोचस यांनी आपला सैनिकी बाणा आणि पवित्रा आपल्या कवितेत आणला. त्यांची कविता होमर आणि हेसिओड यांच्या पंक्तीमध्ये त्यांना बसवते. तसेच त्यांना एलिजि या काव्यपद्धतीचे जनक मानले जाते.
आर्किलोचसचे वडील टेलीसिकल्स एक श्रीमंत पारियन होते, ज्याने थासोस बेटावर वसाहत स्थापन केली. अर्चीलोचस स्वतः पारोस आणि थासोस या दोन्ही बेटांवर राहत होते. त्याच्या कवितेत इ.स.पू. 6 एप्रिल रोजीचे सूर्यग्रहण आणि लिडियन राजा गेजेस (इ.स. 680-645 ईसापूर्व) च्या संपत्तीचा उल्लेख आहे.
प्राचीन चरित्रात्मक परंपरेतील आर्किलोचसच्या जीवनाचा तपशील बहुतेक त्याच्या कवितांतून घेण्यात आला आहे – त्यामुळे त्यात त्याने वर्णन केलेल्या घटना काल्पनिक असू शकतात.
परंतु आधुनिक शोधांनी कवितांमध्ये दिलेल्या चित्राचे समर्थन केले आहे. पारोसवरील पवित्र भागात आर्किलोचसला समर्पित दोन शिलालेख सापडले; ते या दोन पुरूषांच्या नावे आहेत: मॅनेसिप्स शिलालेख (तिसरे शतक बीसीई) आणि सोस्थेनिस शिलालेख (पहिला शतक बीसीई). अथीनियन राजकारणी आणि बौद्धिक समीक्षकांनी आर्किलोचसच्या स्वत: च्या वर्णनास 5 व्या शतकाच्या उत्तरार्धात गांभीर्याने पाहिले होते. आर्किलोचस याने स्वत: ला गरीब, भांडखोर, दु: खी, गुलाम महिलेचा लबाड मुलगा म्हणून आपले वर्णन केल्याबद्दल त्याची निंदा केली. त्यामुळे काही विद्वानांना असे वाटते की त्याच्या कवितांमध्ये चित्रित केलेले आर्किलोचस यांचे वर्णन खरे नव्हते.
आर्किलोचस सैनिक म्हणून काम करत असत. थसॉसच्या जवळ असलेल्या मुख्य भूभागावर थ्रेसियन्सविरूद्ध त्याने लढा दिला आणि जेव्हा थॅशियन्स नॅक्सोस बेटावरील सैनिकांविरुद्ध लढत होते तेव्हा तो मरण पावला. एका प्रसिद्ध कवितेत आर्किलोचस स्वत: ची ढाल लढाईत फेकल्याबद्दल कोणतीही संकोच वा खेद न करता सांगतात. (“मी माझा जीव वाचवला. मला माझ्या ढालीची काय किंमत आहे? गेली उडत! मी आणखी एक विकत घेईन.”)
कविता व इतर पुराव्यांवरून सत्यता निश्चितपणे समजणे कठीण असले तरी आर्किलोचस विवादास्पद असू शकेल. कारण ते आपल्या तीक्ष्ण विनोदाबद्दल आणि निंदात्मक भाषेबद्दल प्रसिद्ध होते.
त्यानी खूप वेगवेगळ्या प्रकारची लयबद्ध रचना त्याच्या कवितेत करून ग्रीक भाषा समृद्ध केली. ते अतिशय सहजपणे होमरिक भाषेमधून दैनंदिन जीवनाच्या भाषेचा वापर एकाच ओळीत करू शकायचे . वैयक्तिक अनुभव आणि आपल्या भावनांबद्दल लिहिणारा तो पहिला युरोपियन लेखक होता. ग्रीक कवितांचे विषय नेहमी वीर योद्धे किंवा प्राचीन सूत्रे असे असायचे. त्यामुळे त्याच्या कवितांचे वेगळेपण दिसून आले. त्याने त्याच्या कवितांमध्ये वैयक्तिक भावनांचा उहापोह केला. होरेस सारख्या नंतरच्या नावाजलेल्या कवींनी त्याच्या शैलीचे आणि कौशल्याचे खूप कौतुक केले. परंतु पिण्डार सारख्या काही नावाजलेल्या कवींनी त्याच्या अनैतिक वागण्याची निंदाही केली.
© लेखिका : अश्विनी मोकाशी
References:Encyclopaedia Britannica, Wikipedia, Greek Language Mosaics at greek-language.gr