उपनिषदांची साथ आणि एकाकीपणाचा ऱ्हास

A Constructive Survey Of Upanishadic Philosophy: Being An Introduction To The Thought Of The Upanishads (An Old Book)

उपनिषदांचा अभ्यास हा आपला खूप मोठा ठेवा आहे. आपली संस्कृती समजण्यात आणि जपण्यात मराठी लोकं नेहमीच अग्रेसर असतात. त्यामुळे प्रत्येक नवीन पिढीला आपल्या संस्कृतीचा वारसा सोपवणे आणि त्यांना आपल्या भारतीय असण्याचा अभिमान निर्माण करणे, या सगळ्या बाबी यात ओघाने येतातच. हे वाचताना त्या वाङ्मयाचे सौंदर्य पण अनुभवता येते. महत्त्वाची बारा उपनिषदे इसवीसनापूर्वी लिहिली गेली आणि ती पिढ्यानपिढ्या पाठांतर करून शिकविली जायची. हिंदू आणि बुद्ध धर्माची बीजेपण उपनिषदात आढळतात. धर्मांच्या अगोदरचे हे जे लिखाण आहे, त्यात धर्माची व्याख्या नसल्यामुळे यात सामाजिक अथवा  धार्मिक भेदाभेद असण्याचा प्रश्न येत नाही.  

उपनिषदांवर बऱ्याच अभ्यासकांनी लेखन केले आहे. त्यापैकीच एक महान लेखक होते प्राध्यापक रा. द. रानडे.  त्यांचे पुस्तक ‘अ कंस्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ द उपनिषदीक फिलॉसॉफी’ इंग्लिशमध्ये आहे. ‘उपनिषदरहस्य’ हा त्याचा अनुवाद आहे. अनुवादकार होते प्राध्यापक कृ वे गजेंद्रगडकर. १९२६ ला प्रसिद्ध झालेले हे पुस्तक लवकरच खूप मान्यता पावले आणि उपनिषदांच्या अभ्यासात अग्रगण्य समजले गेले. या पुस्तकाच्या आधारे आपण आज उपनिषदांच्या साहाय्याने एकाकीपणाचा कसा ऱ्हास होऊ शकतो याचा विचार करूया.

आजचा समाज धर्म, जाती आणि वेगवेगळे isms यात खूप अडकून पडतो आणि पदोपदी आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. कुणाशी मैत्री जोडताना आपण आधी खात्री करून घेतो की त्या व्यक्तीचे आणि आपले विचार जुळतात का नाही, त्यांचा धर्म कुठला, त्यांचे राजकारणावरचे विचार कुठले, सामाजिक विषयांवर त्यांना काय वाटते, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, समाजात त्याच्याबद्दल काय समज आहेत, आपल्याला त्यांचा फायदा होईल का नाही, ते आपल्याबद्दल काय विचार करतील. अशा सगळ्या आपणच निर्माण केलेल्या अटींमुळे इतरांपर्यंत पोचायला आणि समान विचारांचे मित्रमैत्रिणी शोधायला फार वेळ लागतो. याने एकाकीपण वाढते आणि त्रास होऊन शारीरिक आणि मानसिक आजार बळावतात. बरेचदा कुटुंबात राहून देखील लोकांना एकाकीपणाची जाणीव होते. शिवाय नोकरीच्या निमित्ताने देखील बऱ्याचवेळा आपल्या माणसांपासून दूर राहावे लागते. या सगळ्या कसोटींचा सामना करताना त्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मार्ग शोधण्यासाठी आपल्याला या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करणे उपयोगी ठरते. ते कसे तर, तिथे जीवनाच्या मूल्यांचा विचार आहे आणि ती कालाबाधीत असल्याने आजही ती ताजीतवानी वाटतात. त्यामुळे कुठला सापेक्ष विचार न करता आयुष्यात कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या सर्वांना कशा लागू पडतात, याचे मार्गदर्शन होते. 

ईश उपनिषदात सांगितल्याप्रमाणे ‘यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मैवाभुद्विजानतः’ ह्या मंत्राचा अर्थ  प्रत्येक मानव साधन नसून साध्य आहे असे त्याने मानले पाहिजे. दुसऱ्याचा वापर कसा होईल असा विचार न करता त्या व्यक्तीमुळे आपले जीवन जास्त समृद्ध झाले आहे, अशी भावना ठेवल्याने सर्वांप्रती आदर वाटू लागतो. (पान क्र ६-७) त्यामुळे लोकांशी मैत्री करणे, त्यांच्याबद्दल आपुलकी वाटणे, अडीअडचणीला समजून घेणे किंवा आपपरभाव कमी होणे, हे सर्व शक्य होते. सर्व जीव हे आत्म्याचे रूप असतात, म्हणजेच आपल्यात आणि इतरांत एकच आत्मतत्त्व निवास करत असते. ही गोष्ट लक्षात आली की आपण दुसऱ्याचा विचार करताना त्याची जात, धर्म, रंग, आर्थिक स्थिती यांचा विचार ना करता आपण त्यांच्या परिस्थितीत कसे वागू, याचा विचार करू लागतो. 

मला स्वतःला उपनिषदांचे तत्त्वज्ञान फार आकर्षित करते. आत्मतत्त्व म्हणजे काय, त्याचा शोध कसा घ्यायचा, स्वतःची ओळख कशी करून घ्यायची, आपल्यालाच जर स्वतःची ओळख नसेल, तर आपण दुसऱ्याला आपली मते कशी सांगणार? आपल्याबद्दलच्या गैरसमजुती कशा दूर करणार? आपले मत नक्की केव्हा तयार होते किंवा केव्हा पक्के होते, हे आपण कसे ठरवणार. बहुतांशी आपल्याला आपली स्वतःची ओळख असणे हे जरुरीचे असतेच. त्याशिवाय आपली जडणघडण होऊच शकत नाही. स्वतःची ओळख जशीजशी जास्त खोलात जाऊन होईल त्याप्रमाणेच आपली स्वतःचे समर्थन करण्याची, आत्मिक उन्नती आणि समाधान मिळवायची, एकाकीपणा नाहीसा करण्याची आणि जीवनातले चढउतार पार पाडण्याची क्षमतापण वाढत जाते. या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी त्यामागची भूमिका समजून घेणे जरुरी आहे. उपनिषदात अशा तात्त्विक प्रश्नांची बरीच चर्चा आहे. 

सोहम किंवा ‘सः अहं ‘ हे उपनिषदातले महत्त्वाचे तत्त्व आहे. याचा अर्थ असा की सः म्हणजे ते ब्रह्म, हे अहं म्हणजे माझ्यात सामावलेले आहे आणि हे समजून घेणे म्हणजेच आत्मतत्त्व समजून घेणे आणि ते समजून घेण्यासाठी भक्ती मार्गाने ध्यान करून किंवा ज्ञानमार्गाने विचार करून आणि कर्म मार्गाने योग्य काम करून, आपली आपल्याशी ओळख करून घेणे.  आत्मतत्त्व समजून घेऊन मोक्षापर्यंत त्याची वाटचाल कशी होते, याचे मार्गदर्शन या उपनिषदातील मंत्रात आढळते. जेव्हा आत्मा ब्रह्मात विलीन होतो, तेव्हा मोक्षप्राप्ती होते. व्यावहारिक दृष्टीने बघायचे झाले तर समोरच्या माणसाला एक आत्मा या नात्याने आदराने आणि सन्मानाने वागणे, हे समजून येते. 

केन उपनिषदात आत्म्याचे अस्तित्त्व समजून घेण्यासाठी अंगी नम्रता असणे खूप जरुरीचे सांगितले आहे. जर नम्रता नसेल, तर आपल्याला आत्म्याचे ज्ञान होत नाही. आपल्याला खूप अजून शिकायचे आहे, हि भावना असल्याशिवाय काही नवीन शिकता येत नाही.  मैत्रीचे पण गणित असेच आहे. जर आपण नम्रपणे किंवा आदराने दुसऱ्याला वागवले नाही, तर कोणी आपल्याशी मैत्री करणार नाही. ही मूल्ये अंगी बाणावी यासाठी पण कदाचित हा उपदेश केला असेल. (पान क्र ३६)

छांदोग्य आणि मैत्री उपनिषदात मनाचे महत्त्व सांगितले आहे. मन हे सर्वांचे उगमस्थान आहे. मनुष्य मनानेच पाहतो व ऐकतो. (पान क्र ११३) आपले लक्ष नसेल, तर डोळ्यासमोरची गोष्ट देखील जशी नजरेत भरत नाही, त्याप्रमाणेच डोळ्याने बघून देखील मनाची साथ नसेल, तर न दिसल्यासारखेच होते. आपल्या मनात असलेल्या भावना या सगळ्या मनाच्या नियंत्रणाखाली असल्याने कशाची भीती वाटून घ्यायची आणि कशाचे कौतुक वाटून घ्यायचे, हे पण आपल्या हातीच असते. मनावर बुद्धीचे नियंत्रण असल्याने बुद्धीचा वापर करून आपण चांगला निर्णय घेऊ शकतो. अर्थात हे सर्व वाटते तितके सोपे कधीच नसते. जसजसा आपला चांगले निर्णय घेण्याचा सराव वाढत जातो, त्याप्रमाणे आपला आत्मविश्वास, आत्मसम्मान आणि आत्मप्रेम वाढीस लागते. याला काही लोक अध्यात्मातील उन्नती असे देखील मानतात. ध्यानाने आणि सुविचाराने सुद्धा या गोष्टींचा सराव वाढू शकतो. अशा सरावाने आपल्याला अंतरात्म्याची ओळख वाढून काही गोष्टी वेगळ्या स्तरावरपण कळू लागतात. उदाहरणार्थ कोणाला आपण आवडतो आणि कोणाला आवडत नाही, हे कळायला आपण आपल्या मनाशी संवाद साधून पण समजू शकतो. कोण आपल्याशी खरे बोलत आहे आणि कोण दुटप्पीपणे वागत आहे, याचे ज्ञान पण होऊ शकते. त्याप्रमाणेच आपण एकटे नाही, आपल्या पाठीमागे आत्मतत्त्व खंबीर उभे आहे, याची जाणीव होऊन एकटेपणा किंवा भीती वाटणे हे कमी होते. याचा अर्थ असा नव्हे कि आपण व्यावहारिक पद्धतीने आपली काळजी घेऊ नये, पण याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपल्याला आपलं स्वतःचे स्थान समजू लागते, तेव्हा आपले जीवन आनंदाने बहरून जाते आणि आपली दिनचर्या सुखकर होते. 

मुंडकोपनिषदातले एक उदाहरण देताना प्रा. रानडे म्हणतात की एका वृक्षावर जीव आणि ब्रह्म राहात असतात. जीवाला नेहमी आपण निर्बल आहोत असे वाटून दुःख व्हायचे. पण जेव्हा त्याचे ब्रह्माशी ऐक्य होते, तेव्हा तोसुद्धा अनंत शक्तीचा वाटेकरी असल्याचे त्याला जाणवते. (पान क्र २९६) तेव्हा त्याचे दुःख नाहीसे होऊन त्याला अपरिमित आनंद होतो. तशीच जेव्हा आपल्याला जाणीव होते, कि आपण एकटे नाही. आपण या सृष्टीचा भाग आहोत, आपल्या जीवनाचा हेतू सफल करण्याचा प्रयत्न आपण केला, कि आपण आनंदी होतो. तेव्हा आपल्याला चिंता ग्रासत नाहीत, किंवा एकटेपण खायला उठत नाही. त्यामुळे उपनिषदांचा सल्ला घेऊन आपण संयमाने, धैर्याने आणि नीतीने जीवनाला सामोरे जातो, तेव्हा ज्ञान आणि आनंदाचा अनुभव घेण्यास पात्र होतो. 

© लेखिका : अश्विनी मोकाशी 

Leave a Reply