उपनिषदातील भीतीचे निराकरण

Image result for upanishad images

लेखिका: अश्विनी मोकाशी, Ph.D. ©

परिचय

सध्याच्या परिस्थितीत करोना महामारीच्या भीतीमुळे आणि घरात सक्तीने बसावे लागल्याने चिंतेचे विकार वाढत आहेत. लोकांना एकूण जीवनाविषयी चिंता वाटते आणि ते निष्क्रियतेच्या टोकापर्यंत जाऊन काळजी करतात. निष्क्रियतेचे कारण भीती आणि असुरक्षितता आहे; उदाहरणार्थ पुढे काय होईल याची भीती, मृत्यूची किंवा दु: खाची भीती, फायद्याची किंवा तोट्याची भीती, अपयशाची भीती, ताणतणावांची काळजी, इत्यादी. काळजी केल्याने फायदा काहीच होत नाही, परंतु एखाद्या व्यक्तीची उत्पादनशीलतेची पातळी मात्र खाली येते आणि मानसिक शांती नाहीशी होते. चिंता हीच चिंतेचे कारण बनते. मी सध्याच्या साथीतून वाचू शकेन का?  माझे आर्थिक नुकसान भरून निघेल का? या अशा प्रश्नांमुळे आत्मविश्वास ढळू लागतो आणि  कधीकधी असहायतेची जाणीव निर्माण होते. या लेखात आपण चिंता किंवा भीतीची भावना याची कारणमीमांसा करून, त्याचे परीक्षण उत्क्रांतीवाद आणि उपनिषद यांच्या दृष्टिकोनातून करूया आणि या समस्येवर कोणते समाधान मिळते हे पाहण्यासाठी, उपनिषदातील परिच्छेदांचे विश्लेषण करूया.

उत्क्रांतीवादी जीवशास्त्रातील (Evolutionary Biology) भीतीचे विश्लेषण

उत्क्रांतीवादी जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून, शिकारी-जमातीतील मानवांना वन्य प्राणी किंवा इतर शिकारी यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी भीती वाटायची. भीतीमुळे माणूस सतत सावध आणि सतर्क राहतो, जेणेकरून कोणत्याही धोक्यांपासून स्वतःचे रक्षण करणे त्याला शक्य होते. जर जास्त आराम केला किंवा खूप आनंद झाला तर यामुळे माणूस निष्काळजीला बळी पडून  मृत्यूस कारणीभूत ठरू शकायचा. आजच्या काळात जगात खूपच शांततेची परिस्थिती आहे. आता लोकं वन्य पशू आपल्यावर हल्ला करतील याची चिंता न करता शांत झोपतात. जर climate change मुळे काही महापूर आले किंवा साथीच्या आजाराने धुमाकूळ घातला, तर अशाप्रकारची नैसर्गिक आपत्ती किंवा कुठली युद्ध परिस्थिती सोडली तर आपले नेहमीचे आयुष्य नीटनेटके चालू असते. आपल्यातील बहुतेकजण अत्यंत सुसंस्कृत समाजात राहतात, तरीही भीतीची भावना आपल्याबरोबर कायम राहिली आहे. लोक किरकोळ गोष्टींपासून घाबरतात, जसे की त्यांची जीवनशैली, आरोग्य, संपत्ती किंवा तत्सम काही बदल झाले तर त्यांना चिंता वाटते. परंतु त्यांचे अस्तित्व नेहमी धोक्यात येत नाही. असे असून देखील भीती एखाद्याच्या मानसिक स्थितीला अस्वस्थ करून, त्यांना अस्थिर करते. लोक दररोज आपला जीव गमावण्याच्या भीतीने जगत नाहीत, तरीही त्यांच्या चिंता इतक्या खोलवर गेल्या आहेत की त्या लोकांना निष्क्रियतेच्या मार्गावर नेतात. कोणीही आता असे म्हणत नाही, की काय मजा आहे – कोणी पशु किंवा प्राणी इथे माझ्या वाटेला जाणार नाही. परंतु लोकं आपल्या बॉसला एखादा वन्य प्राणी समजून तितकेच घाबरून जातात. 

तैत्तिरिय आणि बृहदारण्यक उपनिषदातील विश्लेषण

उपनिषदांच्या दृष्टिकोनातून बघितले तर, भीती आणि असुरक्षितता स्वतःवर विश्वास नसल्यामुळे उद्भवली आहे. आत्म्यास आणि आत्मशक्तीस न समजल्यामुळे आपण स्वतःवरचा विश्वास गमावून बसतो. आपण स्वतःला विश्वातील लहान कण किंवा अणू किंवा कस्पटासारखे समजतो, ज्याचा काही प्रभाव नाही, ज्याचा कोणाशी किंवा कशाशी संबंध नाही, जो विश्वाचा भाग नाही, जो जगाच्या निर्मितीमध्ये किंवा जगाच्या देखभालीमध्ये भाग घेत नाही, असे आपल्याला वाटते.  तेव्हा अशी व्यक्ती आपल्या अस्तित्वास, आपल्या जीवनास किंवा आपल्या कर्मास जास्त महत्त्व देत नाही. आपण विस्तीर्ण जगाशी कसे बांधलेलो आहोत, हे आपल्या लक्षात येत नाही.  आपल्या कार्यामुळे जगाचे कार्य कसे नियमित चालू राहते आणि जगाच्या प्रभावी कारभारासाठी प्रत्येकाने आपली भूमिका कशी चांगल्या  प्रकारे पार पाडली पाहिजे, याविषयी आपल्याला जाणीव नसते. मग ते  जग म्हणजे आपले कुटुंब असो किंवा आपले कामाचे ठिकाण असो, आपली शाळा किंवा आपला मित्रपरिवार असो, आपण स्वतःला आपल्याच जगाचा हिस्सा मानत नाही. अशा वेळेला एखादा माणूस स्वतःला इतरांपासून दूर, वेगळा ठेवतो. तेव्हा त्याला असा ठाम विश्वास वाटतो की ‘कुणाला आपली काळजी नाही, आपले विचार आणि भावना कुणाला कळत नाहीत आणि या जगात आपल्याला काही किंमत नाही’.

आपण या सृष्टीच्या अस्तित्वापासून वेगळे आहोत या भावनेतून भीती व असुरक्षितता उत्पन्न होते, असे तैत्तिरिय उपनिषदात सांगितले आहे.[1] जर आपण स्वत:ला पूर्णपणे  वेगळे किंवा अद्वितीय मानले, तर  आपण आपल्या अस्तित्वाची व्याख्या, आपल्या इच्छेनुसार आणि आवडी-निवडीनुसार ठरवतो. मग आपण स्वतःला, आपल्या आशाआकांक्षांना, आपल्या वेगळेपणाला इतरांपासून कसे जपावे, याविषयी विचार करण्यास प्रारंभ करतो.  या जगाच्या निर्मितीचा काही उद्देश आहे, यावर आपला विश्वास बसत नाही. हे जग ब्रह्मदेवाची निर्मिती आहे आणि ब्रह्मतत्त्व सर्वत्र अस्तित्वात आहे. स्वत: मध्ये आणि इतरांमध्ये आत्मन म्हणून ते अस्तित्वात आहे, असे जेव्हा आपण मानतो, तेव्हा आपण आपल्या जीवनाचा उद्देश, तसेच या जगाच्या हेतूवर अधिक विश्वास ठेवतो. असे तैत्तिरीय उपनिषदांचे म्हणणे आहे. 

जेव्हा आपण विशिष्टतेच्या भावनेचे समर्थन करतो तेव्हा आपण स्वतःवर, आपल्या इच्छांवर आणि त्या पूर्ण करण्याच्या उद्देशावर आपले लक्ष केंद्रित करतो. इच्छापूर्ती सिद्धांत हा जन्म आणि मृत्यु या पुनर्जन्माच्या चक्राचे कारण आहे. या चक्रात अडकणे हेच एक भीतीदायक चक्र आहे. असा विचार करताना आपण  हे  विसरतो  की आपण ब्रह्माचे एक रूप आहोत, त्याचा एक अंश आहोत.  काही मोठ्या चांगल्या हेतूसाठी आपला जन्म झालेला आहे आणि त्याची पूर्तता करणे हे आपले कर्तव्य आहे. मी एक व्यक्ती म्हणून इतरांपेक्षा वेगळा आहे असा विचार करण्यापेक्षा, मी एक आत्मा असून ब्रह्मतत्त्वाचा एक भाग आहे आणि या ब्रह्मतत्त्वाचा वास्तव प्रत्येकामध्ये आहे – असा विचार करणे श्रेयस्कर ठरेल. आत्म्याचे सर्वांमधील अस्तित्व ही आपल्या सर्वांमधील समानता आहे.

ही समानता आपल्याला इतर कोणत्याही व्यक्तीसारखे बनवते असे नाही. आपली कर्तव्ये, आपले ध्येय, आपली पूर्वकर्मे आणि आपल्या मार्गांनी आपले व्यक्तिमत्त्व बनते. त्यायोगे आपले वेगळेपण दिसून येते. लोकांमध्ये मतभेद आहेत हे नाकारता येत नाही, तथापि आपण सर्वांशी जोडलेले आहोत हे सत्य आहे. उपनिषदांच्या मते आपल्या सर्वांमध्ये निवास करणारे आत्मतत्त्व (individual Self) हे ब्रह्मतत्त्वाचा (universal Self) एक अंश आहे. त्या दृष्टीने आपण समान आहोत.

बृहदारण्यक उपनिषदात एक रूपक कथा आहे.[2] सुरुवातीच्या काळात आत्म्याला एकटेपणाची खूप भीती वाटायची. जेव्हा आत्म्याला समजले की तोच एक सर्वत्र आहे आणि दुसरे कोणी नाही, तेव्हा त्याची भीती नष्ट झाली. नंतर मात्र त्याला एकटे राहून कंटाळा आला, म्हणून त्याने स्वतःचेच दोन भाग केले आणि त्याचे रूपांतर पुरुष आणि स्त्रियांमध्ये झाले. अशा प्रकारे सर्व पुरुष आणि स्त्रिया आत्म्यामध्येच समाविष्ट असतात.

गीतेतील कथा

भगवद्गीतेला गीतोपनिषद म्हणूनही ओळखले जाते. गीतेचे कथानक म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी राजपुत्र अर्जुनाला दिलेला सल्ला. रणांगणावर असलेल्या लाखो सैनिकांमधील सर्वात धुरंधर धनुर्धारी, सेनापती अर्जुन त्या क्षणी खचून जाऊन गोंधळात पडला आहे आणि आपल्या शत्रूंना ठार मारण्याचे आपले कर्तव्य बजावावे की नाही या संभ्रमात आहे. जीवहानीच्या कृत्यासाठी पाप करावे का शत्रूंकडून अन्याय झालेल्या भावनेने जगावे, लढण्याचे कर्तव्य सोडून आपला राज्यावरचा हक्क सोडावा की आपल्या नातेवाईकांचा जीव वाचवावा, हा संभ्रम ही एक गंभीर समस्या आहे. अर्जुनाच्या चिंतेला श्रीकृष्णांनी दिलेला प्रतिसाद म्हणजे कर्मयोगाची  रहस्ये समजावून सांगणे. जर अर्जुनाने फक्त आपल्यावर सोपवलेली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली, तर एक अत्यंत कठीण कार्य पूर्ण केल्यामुळे इतिहासात त्याला सन्मानाची जागा मिळेल आणि सर्वत्र त्याचा गौरव होईल. शिवाय जग अन्यायातून मुक्त होईल आणि जगाचे पुनरुत्थान होईल.  गीतेच्या १८ व्या अध्यायात, [3] भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितले की त्यांनी या युद्धाची पूर्वसूचना आणि न्याय मिळवून देण्यासाठी आधीच व्यवस्था केली आहे. त्याने अर्जुनाला या युद्धाचा सेनापती म्हणून निवडले आहे आणि अर्जुन हा ईश्वराची इच्छा पूर्ण करण्याचे एक साधन, एक निमित्त आहे. जेव्हा अर्जुनाला आपल्या जीवनाचा हेतू समजतो आणि आपली कर्तव्ये पार पाडण्याची गरज जगाला कशी आहे हे समजते, तेव्हा तो चिंतामुक्त होतो आणि कठीण कार्य करण्यास धजावतो.

वेदांताचे संस्थापक आदि शंकराचाऱ्यांची कथा

वेदांताचे संस्थापक आदि शंकराचार्य यांना मायावादाच्या सिद्धांताचे जनक समजले जाते. त्यांची एक कथा अशी आहे. वेदांतातील मायावादाचा सिद्धांत म्हणतो की संपूर्ण जग हा एक भ्रम आहे आणि फक्त आत्माच वास्तविक सत्य आहे. तर एकदा आदि शंकरांना कोणी विचारलं की, एखादा वन्य बैल तुमच्या अंगावर आला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? आदि शंकर म्हणाले, मी दुसऱ्या दिशेने धाव घेईन आणि माझा जीव वाचवेन. तेव्हा प्रश्न विचारणारा म्हणाला, पण संपूर्ण जग जर माया आहे, तर तुम्ही बैलाला का घाबरत आहात? आदि शंकरांनी उत्तर दिले की बैल म्हणजे माया आहे आणि त्याचप्रमाणे माझा जीव वाचवण्याचा प्रयत्नसुद्धा माया आहे. जोपर्यंत मी या शरीरात आहे, तोपर्यंत मला मायापासून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

छांदोग्य उपनिषदातील कथा

पुढील कथा छांदोग्य उपनिषदातील आहे.[4] डोळ्यावर पट्टी बांधलेल्या माणसाची ही रूपक कथा आहे. दरोडेखोरांनी या व्यक्तीला लुटले, त्याचे डोळे हात बांधले आणि गंधार शहराबाहेर एका जंगलात त्याला सोडले. गंधार शहरात आपल्या घरी, कुटुंबाकडे कसे परत जायचे याची त्याला काळजी पडली. तो असहाय्य अवस्थेत एका जंगलात अडकलेला आहे. या क्षणी, एक ज्ञानी आध्यात्मिक गुरू त्याला सूचना देऊन मदत करतो. त्या मार्गदर्शनानुसार सूचनांचे पालन करून तो माणूस असहाय्य आणि आंधळा असूनही सुखरूप आपल्या घरी पोहोचतो. तो आणि त्याचे कुटुंबीय आनंदी होतात. त्या माणसाला हे समजले होते की जरी दरोडेखोरांनी त्याला लुटले असेल, त्याला वाईट वागणूक दिली असेल, तरी तो दिशा दर्शविणारा आवाज म्हणजे एखाद्या ज्ञानी माणसाचा आवाज आहे, ज्याला तो आपला गुरु मानतो. तो त्यांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या घरी परत जातो. कधीकधी आपला विश्वास एखाद्या आदरणीय व्यक्तीवर असतो, जसे की गुरु किंवा पालक असतील. कधीकधी आपण स्वतःवर विश्वास ठेवतो की आपण अधिक प्रयत्न केला, तर आपण काही चांगले करू शकतो. नकारात्मकतेचे अडथळे ओलांडून सकारात्मक परिणामावर विश्वास ठेवून, नवीन दालने उघडू शकतात. या कथेत पट्टी बांधणे म्हणजे आपल्या चुकीच्या समजुती, अज्ञान आणि आकांक्षा यांचे रूपक आहे, तर घरी पोहोचणे म्हणजे आत्म-प्राप्तीपर्यंत पोहोचण्याचे लक्षण आहे. आत्म-प्राप्तीकडे जाण्याचा हा प्रवास आनंदात परिपूर्ण होतो.[5]

ग्रीक तत्वज्ञ प्लेटोच्या वाङ्मयातील कथा

अशीच एक कथा ग्रीक तत्वज्ञ प्लेटोच्या वाङ्मयातील प्रजासत्ताक (Republic) या ग्रंथात आढळते, जी गुहेचे रूपक म्हणून ओळखली जाते.[6] एका गुहेत साखळदंडांनी बांधलेले लोकं रहात असतात, जे अशा स्थितीत देखील त्यांच्या अडथळ्यांना पार करतात. प्रथम त्यांना शेजारच्या खोलीतून येणाऱ्या अग्नीच्या प्रकाशामुळे निर्माण झालेल्या सावल्या दिसतात. तेव्हा ते मान वळवून बघतात, तर त्यांना अग्नी दिसतो. अग्नीच्या दिशेने जाताना त्यांना गुहेच्या बाहेरून येणारा प्रकाश दिसतो. त्या प्रकाशाच्या बळावरुन जेव्हा ते गुहेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना आकाशात तळपणारा सूर्य दिसतो. त्याक्षणी त्यांना तेजाचा अनुभव येतो, कारण सूर्याशिवाय जास्त तेजःपुंज काही असूच शकत नाही.

गुहेत असताना आणि साखळदंडात जखडलेले असताना त्यांचे विचार मुख्यत: समोर दिसणाऱ्या सावल्यांशी निगडीत असतात. परंतु जेंव्हा ते कुतूहलाने सावल्या कोठून येत आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना शेजारीच अजून एक खोली आणि खोलीत तप्त असलेला अग्नी दिसतो. ते स्वत: ला आव्हान देतात तेव्हा त्यांना कळते की गुहेला एक प्रवेशद्वार आहे आणि तिथे प्रकाश आहे, जो त्या गुहेतल्या अग्नीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. ते मोठ्या प्रयत्नाने गुहेतून बाहेर पडतात आणि त्यांना प्रथमच सूर्यप्रकाशाचे दर्शन होते. नंतर त्यांनी आकाशात वर पाहिल्यावर त्यांना आकाशातील तेजस्वी सूर्याचे दर्शन होते. त्या क्षणी त्यांचे शिक्षण आणि ज्ञान पूर्ण होते. सूर्यापेक्षा तेजःपुंज  काहीही नाही. परंतु त्यांना गडद गुहेत साखळदंडात बसून असलेल्या अवस्थेत सूर्याच्या अस्तित्वाविषयी माहिती नसते. या साखळ्या रूपकात्मक आहेत. त्याचप्रकारे आपल्या अडचणी व चिंता अशा आहेत की त्या आपल्याला ज्ञानी होण्यापासून वंचित करतात. आपण स्वत: ला वेगवेगळ्या संधी शोधण्यासाठी उद्युक्त करतो, तेव्हा आपण जीवनात नवीन उपक्रमांचा श्रीगणेशा करतो. निराशेने आपण ग्रासलेले असतो, तेव्हा आपणही गुहेतल्या लोकांसारखे हताश झालेले असतो, ज्यांना पुढच्या खोलीत कसे जायचे किंवा जीवनातले पुढचे पाऊल कसे उचलायचे हे माहीत नसते.

निष्कर्ष

आत्म्यावर आणि त्यायोगे स्वतःवर विश्वास ठेवण्याचा मार्ग आपली मनोवृत्ती बदलण्यास आणि जगाकडे काही वेगळ्या दृष्टीने पाहण्यास मदत करतो.  या जगाची काही योजना आहे आणि आपण सर्व ब्रह्मतत्त्वाचे पालनकर्ते आहोत असा जेव्हा आपला विश्वास असेल, तेव्हा आपण स्वतःची काळजी घेण्यास आणि कर्तव्यावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम बनतो. त्यामुळे सर्वांची उन्नती होते, इतरांशी संबंध सुधारतात आणि इतरांबद्दल सहानुभूती वाटते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि चिंता कमी होते. ताणतणाव आणि काळज्या हा जीवनातील अविभाज्य भाग आहे हे स्वीकारून त्यांच्याशी चार हात करण्याची आपली क्षमता  वाढते. त्यामुळे मानसिक आणि शारिरीक सामर्थ्य कायम राखल्याने आपण मानसिक आजारांना बळी पडत नाही. एकदा नकारात्मक, चिंताग्रस्त विचारांवर विजय मिळविल्यानंतर चांगले सकारात्मक विचार निर्माण होऊ शकतात. सकारात्मक आणि संतुलित विचारांनी, निष्क्रियता किंवा अतिउत्साह या दोन्हींमधील फरक समजून योग्य निर्णय घेण्यास मदत होते. त्यामुळे उत्पादकता वाढते, चांगल्या दर्जाची जीवनशैली प्राप्त होते आणि जीवनाचा आस्वाद घेऊन ज्ञानप्राप्तीकडे सुखाची वाटचाल सुरु होते.

संदर्भ:

  1. A Constructive Survey of the Upanishadic Philosophy, R. D. Ranade, 2002, Bharatiya Vidya Bhavan https://archive.org/details/A.Constructive.Survey.of.Upanishadic.Philosophy.by.R.D.Ranade.1926.djvu/page/n1/mode/2up
  2. Chhandogya Upanishad https://en.wikipedia.org/wiki/Chandogya_Upanishad
  3. Plato’s Republic, http://classics.mit.edu/Plato/republic.8.vii.html
  4. [1] Brihadaranyaka Upanishad I.4.2, First Adhyaya, Fourth Brahmana, Points 2 and 3 https://www.hinduwebsite.com/sacredscripts/hinduism/upanishads/brihad.asp#adh1
  5. Taittiriya Upanishad, Section 7 ‘The Blissful Nature of Brahman’ https://www.hinduwebsite.com/taittiriya-upanishad.asp

Footnotes:

[1] Taittiriya Upanishad, Section 7, https://www.hinduwebsite.com/taittiriya-upanishad.asp

[2] Brihadaranyaka Upanishad I.4.2, First Adhyaya, Fourth Brahmana, Points 2 and 3

[3] Bhagavad-Gita, Adhyaya 18, Shlok 67

[4] Chandogya Upanishad, 6.14, Man’s Journey to Self-Knowledge

[5] A Constructive Survey of Upanishadic Philosophy, by R. D. Ranade, 2002, Bharatiya Vidya Bhavan, pages 331-332

[6] Plato’s Republic, book VII

11 thoughts on “उपनिषदातील भीतीचे निराकरण”

    1. If you read English, then the English article is currently available on the blog under the title, ‘Upanishadic Antidote to Anxiety’. I’ll try Hindi in course of time. Thanks for the suggestion!

Leave a Reply