चांगले जीवन कसे जगावे

लेखिका : अश्विनी मोकाशी  (c)

मानवी इतिहासामध्ये संपूर्ण पृथ्वीवरील प्रत्येकजण आनंदाचा आणि सुखाचा पाठपुरावा करतो. जगातील सर्वत्र प्रचलित असलेल्या या पाठपुराव्यासंदर्भात काही सत्ये असली पाहिजेत हे गृहीत धरून मी या विषयावरील प्राचीन तत्त्वज्ञानाकडे वळले. सुखाचा रस्ता सुज्ञ आणि नैतिक निवडीतून जाईल, याची मला कल्पनाही नव्हती. जर ते प्राचीन तत्त्ववेत्तांसाठी खरे होते तर ते अजूनही सत्य आहे का? जीवनाच्या काही मूलभूत तत्त्वांपर्यंत  पोचण्यासाठी आपल्याला विविध अडथळ्यांना पार करणे शक्य आहे का, ज्यामुळे आपल्याला एक चांगले जीवन जगता येईल?


ग्रीक / रोमन तत्त्वज्ञानातील ‘सेपियन्स’, आणि गीता-उपनिषदांच्या भारतीय तत्वज्ञानात ‘स्थितप्रज्ञ ’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या मानवाचा आदर्श पुढे येतो. त्यांनी आम्हाला प्रदान केलेल्या जीवन सुकर करणाऱ्या साधनांमध्ये पुढील तत्त्वे आढळतात – आपल्या परिस्थितीपासून अलिप्त राहणे, सखोल  विचार करून योग्य निर्णय घेणे, आपल्या विचारांना आणि कल्पनांना तपासून घेऊन  त्यांचे विश्लेषण करणे , स्वतःवर किंवा इतरांवर अन्याय न करता नैतिक रीतीने वागणे, आपल्या नकारात्मक भावनांवर  विशेषतः राग, शोक आणि चिंता यांवर नियंत्रण मिळवणे, काही अपरिहार्य गोष्टी निसर्गाचा नियम म्हणून स्वीकारणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गाचे कायदे, विज्ञानाची तथ्ये आणि आपली भावनिक रचना समजून घेणे. जेव्हा हे एक अशक्य काम आहे असे वाटते, तेव्हा जसे अर्जुनाने गीतेतील भगवान श्रीकृष्णाशी सल्लामसलत केली, याचा विचार करावा; किंवा सॉक्रेटिसने बाजारपेठेतील इतर तथाकथित सुज्ञ लोकांचा सल्ला घेतला आणि सॉक्रॅटिक पद्धतीने विचारपूस करुन त्यांच्या तथाकथित विचारांना कसे आव्हान दिले, त्याचा विचार करावा आणि आपले विचार तपासून पाहावेत. 


या मार्गावरील मुख्य अडथळे म्हणजे भावनाग्रस्त होणे  किंवा नकारात्मक भावना अंगीकारणे. आजकाल आपण बघतो की तरुण लोकांना चिंता, नैराश्य आणि उदासिनता खूप सतावते. कधी आपण एखादी मोठी संधी गमावल्यामुळे किंवा कधी पराभूत झाल्याने असे वाटणे साहजिक आहे. जे कामात अपयशी ठरतात, त्यांच्या बाबतीत हे औदासिन्य नजरेस येते, परंतु जे अत्यंत यशस्वी आहेत त्यांच्या बाबतीतही हे घडू शकते . त्याचे कारण असे आहे की कोणत्याही प्रकारची नकारघंटा स्वीकार करणे कठीण जाते.  ही नकारघंटा कधी आपल्या कारकीर्दीत आपल्या कामाच्या ठिकाणी ऐकू येते, तर कधी आपल्या कुटुंबात किंवा आपल्या प्रेम-जीवनात ऐकू येते. अशा वेळेला थोडे परिस्थितीपासून दूर जाऊन, थोडा अलिप्तपणे विचार केला की नव्याने त्या परिस्थितीकडे बघण्यास, आपली नवीन ध्येय निश्चित करण्यास आणि ते ध्येय योग्य आहे की नाही हे ठरवण्यास मदत होईल. म्हणून अलिप्तपणे आणि धोरणात्मक विचारसरणीमुळे आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय, हे समजायला  मदत होईल. ते शहाणपण आहे. गीतेमध्ये हे ‘वैराग्य’ आणि स्टोइसिझम मध्ये ते ‘आपेथिया’ या नावाने ओळखले जाते. अलिप्तपणा शिकणे किंवा शिकवणे खूप अवघड आहे परंतु तरीही जीवनातील चढउतारांत अलिप्त राहणे आणि शांत राहणे हे फारच गरजेचे आहे, अन्यथा उलथापालथ झाल्याशिवाय राहणार नाही.


तसं बघायला गेलं तर ,आपण आता एका जागतिक खेड्यात राहत आहोत, जिथे वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकं येतात आणि कायमचे वास्तव्य करतात. कुठल्याही शहरी भागात काही लोकं तिथले रहिवासी असतात आणि काही दुसरीकडून आलेले असतात. त्यामुळे कल्पनांची देवाणघेवाण होते आणि संस्कृतीचे मिश्रण नेहमीच आढळते. पण त्यामुळे सर्व प्रकारचे संभ्रम पण वाढतात. कुठल्या पद्धती योग्य आणि कुठल्या अयोग्य या गोंधळांतून मार्ग काढण्यासाठी मूल्यांवर आधारित, तत्त्वांवर आधारित परिस्थिती निर्माण करून, जिथे सार्वत्रिक मूल्यांवर सहमती दिली जाते, तिथे जीवनाचा सूर गवसतो. त्या दृष्टीने तुलनात्मक तत्त्वज्ञान फार उपयुक्त ठरते, विशेषत: जेव्हा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य  प्राचीन ग्रंथ कोणत्या मूल्यांचा पाठपुरावा करावा हे सांगतात आणि सर्वांसाठी चांगले जीवन कसे जगावे या मुद्द्यांवर त्यांचे एकमत झालेले दिसते, तेव्हा तिथे तथ्य आहे हे लक्षात येते. गीता आणि स्टोइक सेनेका यांच्या ‘ज्ञानी’ व्यक्तीच्या संकल्पनेत उल्लेखनीय साम्य आढळून येते , यासाठी योग्य कृती ठरविण्याकरिता बौद्धिक अचूकपणाचा वापर करणे (ज्ञानमार्ग) आवश्यक आहे, त्यानंतर योग्य कृती अंमलात आणणे (कर्ममार्ग) आणि सर्वांना नीट समजून देणे हे फायदेशीर ठरेल. 


आपल्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये जेव्हा साधर्म्य असते, त्याचबरोबर सकारात्मक भावनांचा वापर किंवा नकारात्मक भावनांचा अभाव असतो, तेव्हा मनाची शांती आणि आनंदाची स्थिती निर्माण होते. आपण जितके अधिक त्या प्रकारे राहण्याचा प्रयत्न करतो, तितका जास्त प्रमाणात आनंद घेत असतो. हा सिद्धांत इच्छापूर्तीच्या कल्पनेपेक्षा भिन्न आहे. आनंदी होण्यासाठी संपत्ती, आरोग्य, सौंदर्य आणि मजेची उद्दीष्टे पूर्ण केल्याने आपल्याला थोडाफार क्षणिक आनंद होईल आणि एका विशिष्ट वयात ते महत्वाचे सुद्धा आहे, परंतु दीर्घकाळपर्यंत तणावरहीत आणि सुखी होण्याचा ज्ञान मार्ग हा नाही. ज्ञान मार्गाने मिळालेल्या सुखाचे अनुसरण करताना, आपल्या  विचारांना सतत तपासून घेतले पाहिजे, धोरणात्मक असले पाहिजे आणि आपल्या कृतीच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या  स्वप्नातील कार विकत घेतल्यामुळे जर बरेच वर्षे दिवाळखोरीत राहावे लागणार असेल, तर त्या कार विकत घेण्याला काही किंमत राहणार नाही. त्याचप्रमाणे एखादी उच्च पगाराची नोकरी स्वीकारली, पण त्यासाठी लागणारी मेहनत किंवा परिश्रम करण्याची आणि गरज पडल्यास प्रवास करून कामाच्या ठिकाणी एकाकी जीवन जगण्याची तयारी नसेल, तर अशी  नोकरी घेणे ही योग्य संधी असू शकत नाही. अशा प्रकारे तर तम् भावाचा विचार केल्यावर लक्षात येते की, इतर काहीही नसले तरी, ज्ञान मार्गाचा अवलंब केल्याने आपल्याला आपले जीवन योग्य दिशेने नेता येईल आणि त्याचबरोबर नीतीने आणि न्यायाने वागून आपले सर्वांचे  जीवन दीर्घकाळपर्यंत तणावमुक्त, सुखी आणि समृद्ध करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करता येईल.

Leave a Reply