बॉलिवूडमधील दुर्घटनेनंतर

लेखिका – अश्विनी मोकाशी, Ph.D ©

बॉलिवूडचा तरुण आणि प्रतिभावान कलाकार सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची बातमी अतिशय दुःखद आहे. चित्रपट किंवा संगीत क्षेत्रातील कलाकार आणि संगीतकार, उच्च शिक्षण संस्थांमधील काही उच्च शिक्षित लोक, किंवा इतर प्रतिभावंत व्यक्ती आत्महत्या करण्याच्या कृतीला बळी पडले आहेत. प्रतिभावंत आणि यशस्वी लोक आपल्या यशाचा अभिमान बाळगतील आणि इतरांपेक्षा त्यांचे आयुष्य अधिक आनंदित व्यतीत करतील, असे आपल्याला वाटते. परंतु, यशस्वी झालेल्यांना, आपले यश अनेक स्तरांवर जगात टिकवून ठेवणे सोपे जात नाही. यशस्वी आणि आदरणीय व्यक्ती म्हणून आपली प्रतिमा टिकवून ठेवण्याची गरज, हे फार मोठे बंधन वाटते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा नकार स्वीकारणे फार कठीण जाते. अशा परिस्थितीत या हुशार लोकांना मदत करण्याचा काही मार्ग आहे का? यश टिकवणे आणि अपयश पचवणे हे शक्य आहे का?

कुठेतरी आपण विसरून गेलो आहोत की जीवन हे जगण्यासाठी आहे, श्रीमंत किंवा शक्तिशाली होण्यासाठी नाही. आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त आनंदाने आणि कर्तृत्वाने जगण्याचा विचार आपल्या तत्त्वज्ञानात केलेला आहे. त्यानुसार काही दुःखांचा आपल्याला सामना करणे आवश्यक आहेच, उदाहरणार्थ सापेक्ष किंवा पूर्ण गरिबी, नैसर्गिक आपत्ती, रोग, युद्धे, दहशतवाद, आर्थिक हानी किंवा कोणत्याही प्रकारच्या हिंसेपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आत्मविश्वासाचा अभाव, नैराश्य, चिंता, क्रोध, भावनिक विकार किंवा त्यामुळे निर्माण झालेल्या असहायतेपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे युद्ध आणि दुष्काळ असल्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे आणि त्यामुळे जीवनप्रवाह विस्कळीत झाला आहे. कोणत्याही कृतीशिवाय किंवा सामाजिक संपर्काशिवाय एकाच ठिकाणी राहून जगण्याची सवय किंवा त्यासाठी लागणारे कौशल्य आपल्याकडे नाही. आपल्या घरापासून दूर अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगाराचे दुःख आपल्याला जाणवते – पण आपण स्वतःला त्यांच्या परिस्थितीपासून दूर ठेवतो. आपण स्वत: जोपर्यंत अशा गंभीर परिस्थितीत अडकत नाही, तोपर्यंत आपण आपल्या विचारांच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलू शकत नाही, जसे की, आपण दूरदेशी अडकलो असतो आणि कुठले पर्याय समोर दिसत नसतील, तर ही समस्या कशी सोडवायची? पण इथेच सर्वात जास्त सुधारणा करण्याची गरज आहे. जे चांगले जीवन जगतात त्यांनीही आपली विचारसरणी सकारात्मक आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून ते एखाद्या गंभीर परिस्थितीतून स्वःताला सावरू शकतील.

बुद्धी, दृष्टिकोन, सकारात्मक विचार आणि चांगले निर्णय घेणे हे चांगले जीवन जगण्यासाठी महत्त्वाचे आहे. या साधनांच्या मदतीशिवाय लोक कोणत्याही रोगांशी किंवा गंभीर परिस्थितीशी लढू शकत नाहीत. जेव्हा परिस्थिती चांगली असते, तेव्हा असे गृहीत धरले जाते की त्यांचे जीवन असेच चालू राहील. पण अचानक आयुष्य तुम्हाला अशा वळणावर नेते, कि मग ती नोकरी गमावणे असो किंवा जवळच्या व्यक्तीला गमावणे असो किंवा सद्य परिस्थितीत लॉक डाऊनमध्ये रहाणे असो किंवा एखाद्या लाजीरवाण्या नकारामुळे आयुष्यातील सर्व निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणे असो, जेथे जीवनाचा सामना करणे फार कठीण जाते. कधीकधी लोक आपली स्वत:ची जाणीव आपली ओळख विसरतात, नैराश्य येते आणि औषधांवर पूर्णपणे विसंबून राहावे लागते आणि त्यांच्या मूलभूत गरजांसाठी पण आधाराची गरज लागते. अशा वेळेला जर सपोर्ट सिस्टीम मजबूत असेल तर ती लोकं बरी होऊ शकतात, पण जर सपोर्ट सिस्टीम कमजोर असेल किंवा अस्तित्वात नसेल, तर लोकं ड्रग्ज घेण्याकडे किंवा आत्महत्येकडे झुकतात.

वेळोवेळी एक साधा प्रश्न आपण आपल्याला विचारावा, तो म्हणजे ‘हे आवश्यक आहे का?’ जेव्हा आपण कुणाशी भांडतो किंवा जेव्हा वाईट मूडमध्ये असतो किंवा एखाद्या वाईट बॉसशी किंवा एखाद्या दादागिरीशी सामना करतो, तेव्हा आपल्या सहनशीलतेची परीक्षा होते. कधी आपण चुकीचे विधान करतो आणि कधीकधी आपल्याला कठोर पावले उचलण्यास भडकावलं जातं आणि मग आपल्याला पश्चात्ताप होतो. लवकरच, आपल्या पश्चात्तापाची कृत्ये वाढत जातात आणि आपण आपल्या कृतींबद्दल बचावात्मक पवित्रा घेतो. थोडक्यात, आपण चुकीच्या गोष्टी करण्याचे आणि आपल्या चुकीच्या कृतींचे समर्थन करण्याचे कौशल्य प्राप्त करतो. इथे योग्य गोष्ट ही ठरेल की आपली चूक स्वीकारणे, ही नकारात्मक कौशल्ये विसरणे आणि काही सकारात्मक कौशल्ये शिकणे. या प्रक्रियेसाठी खूप कष्ट लागतात आणि कधीकधी आपण चूक केली आहे, हे मान्य करणे खूप वेदनादायक असते. म्हणून आपण आपल्याला बदलण्याचा फारसा प्रयत्न करत नाही. आपल्याला जे सहजपणे येत असते, ते आपण तसेच करत राहतो. आपल्या कृती आणि प्रतिक्रिया पुन्हा पुन्हा त्याचप्रकारे करतो. हे फारसे उपयोगी नाही.

कधीकधी विचार-शुद्धी केली पाहिजे. आपले विचार अधिक उत्पादक, अधिक प्रभावी होऊ शकतात का आणि आपण चांगले आदर्श बनत आहोत का हे पाहण्यासाठी विचार-शुद्धी केली पाहिजे. जेव्हा आपण आपली नकारात्मक विचारसरणी विसरतो आणि त्याऐवजी सकारात्मक काहीतरी शिकतो, तेव्हा आपल्याला दीर्घकालीन दृष्टिकोन प्राप्त होतो. पण नकारात्मक कौशल्याची जागा सकारात्मक कौशल्याने घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि कधीकधी त्यामुळे खूप गोंधळ होतो. जे लोक आपल्याला नकारात्मक विचारसरणीचा वापर करताना पाहतात, ते आपण तसेच करू अशी अपेक्षा ठेवतात आणि आपल्या नवीन विचारसरणीला प्रतिबंध करतात. म्हणून, स्वत:चा बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून चांगले काम करणे. यामुळे आपल्याला दीर्घकालीन मदत होईल. उदाहरणार्थ, जर आपल्याला इतरांबद्दल गॉसिपिंग करायची सवय असेल तर आपण इतर गॉसिपर्सकडे आकर्षित होणार आहोत. पण जर कधी आपण गॉसिपिंग बंद करायचं ठरवलं आणि इतर लोकांबद्दल फक्त चांगल्या गोष्टी बोलायला सुरुवात केली तर आपले मित्र आपली थट्टा करतील किंवा आपल्याला सोडून जातील. त्यामुळे गॉसिपिंग करत राहायचं की मित्रपरिवार गमावायचा, अशा आपण पेचात सापडतो. योग्य काम करणे कठीण असते. पण जर आपण योग्य ते काम केले तर इतरांवर प्रभाव पाडण्याची शक्तीही आपण विकसित करतो आणि यथावकाश इतरांना पण चांगल्या कामासाठी उद्युक्त करतो. त्याचप्रमाणे अपयशाला धैर्याने तोंड देण्यासाठी त्याची मीमांसा करून, त्यातील उणिवा दूर करून, त्यातून काय शिकता येईल हे बघितल्यावर काय उपाययोजना करता येईल आणि कुठले गूण विकसित करायला हवेत, याची जाणीव होते. हताश न होता स्वतःवरील विश्वास कायम ठेवून, असेल त्या परिस्थितीतून सकारात्मक मार्ग काढता येतो.

या नव्या सवयी आपल्याला अधिक सुज्ञ बनवू शकतात. त्यामुळे चिंता आणि नैराश्य येण्याची शक्यताही कमी होते आणि शेवटी आत्महत्येला बळी पडण्याची शक्यता कमी होते. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकालीन दृष्टी विकसित करते तेव्हा प्रत्येक समस्येवर उपाय शोधून काढता येतो आणि आपल्या लहान-मोठ्या प्रश्नांवर, किंवा आपल्या मोठ्या चिंतांवर देखील पर्याय सापडतात. आत्महत्या ही अनैसर्गिक गोष्ट आहे आणि जीवनात दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही तेव्हा निराशेतून ती निर्माण होते. चढउतार हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्यासमोर असलेल्या सर्व समस्या, कोणत्याना कोणत्या प्रकारे यापूर्वी पण इतरांना होत्या आणि आजही लोकांना आहेत आणि म्हणूनच व्यावहारिक समस्या किंवा भावनिक प्रश्नांवर उपाय उपलब्ध आहेत. उपाय शोधण्यासाठी धीराने प्रयत्न करून, स्वतःवर विश्वास आणि दीर्घदृष्टी ठेवल्याने, आज ना उद्या काही दरवाजे नक्की उघडतील. आयुष्य पूर्वीपेक्षा कदाचित वेगळे दिसेल, तरी ते चालू राहील आणि कालांतराने तेही भरभराटीस येईल.


Leave a Reply