११००+ वाचकांचा प्रतिसाद 

Image result for celebration image"

धन्यवाद, वाचकांनी माझ्या ब्लॉगचे ११०० पेक्षा जास्त वेळा वाचन करून जे समर्थन केले, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!  

मी ब्लॉग सुरू केला तेव्हा मनात विचार केला होता, की माझ्या हातावर मोजण्याइतक्या काही मित्रमैत्रिणींना थोडेफार तत्वज्ञानाचे विचार वाचण्यास जरी मी राजी करू शकले, तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. खरंच, कोण वाचतो तत्वज्ञान ?  

या ब्लॉगवरील इंग्रजी आणि मराठीतील माझे लेख वीस वेगवेगळ्या देशांच्या लोकांनी वाचले. याव्यतिरिक्त, शेकडो शैक्षणिकांकडून रिसर्चगेट, अकॅडेमिया व इतर वेबसाइट्सवर  हे लेख वाचले गेले. जोन गोल्डस्टईन यांच्या निमंत्रणावरून प्रसारित झालेल्या टीव्ही मुलाखतीला  ‘टॉप टेन व्ह्यूज’ मधील दुसरे स्थान प्रिन्सटन कम्युनिटी टीव्हीद्वारे मिळाले. एक ऑप-एड लेख इंडियन एक्स्प्रेसमध्ये, तर एक ऑप-एड लेख लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाला. त्याबद्दल श्री गिरीश कुबेर या लोकसत्ताच्या संपादकांचे खूप खूप आभार. माझे इंग्रजीतील पुस्तक ‘सेपियन्स अँड स्थितप्रज्ञ’ मागील वर्षी प्रसिद्ध झाले तेव्हा, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इंस्टीट्युटने मला भाषण द्यायला आमंत्रित करून जो बहुमान दिला त्याबद्दल त्या संस्थेचे आणि संस्थेचे सेक्रेटरी या नात्याने प्राध्यापक श्रीकांत बाहुलकर यांची मी खूप आभारी आहे. या भाषणाचा वृत्तांत पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या लोकल इंडियन एक्सप्रेस मध्ये केल्याबद्दल मी अनुराधा मसकॅरेन्हास यांची आणि त्यांच्या टीमची पण ऋणी आहे. हे सर्व खूप विलक्षण आहे.

या ब्लॉगची आणि तात्विक लेखांची प्रेरणा माझ्या थोड्याफार केलेल्या सामाजिक कार्याद्वारे आणि आयुष्यभर केलेल्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे प्राप्त झाली आहे. मी  कॉलेजमध्ये  असताना पुण्यातील कैद्यांच्या मुलांना भारतीय तत्त्वज्ञानातील गोष्टी सांगायचे, पुण्यातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वचछतेचे महत्त्व पटवून द्यायचे. गेल्या काही वर्षातअमेरिकेतल्या सूप किचनमध्ये वाढपी म्हणून मदत करायचे किंवा न्यू जर्सीमधील आपत्कालीन वैद्यकीय सेवेची  (प्रशिक्षणार्थी) कार्यकर्ता या नात्याने अँब्युलन्स चालवायचे. काही वर्षे मी नवी दिल्लीतील रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसमवेत त्यांना शिकवण्याचे काम करणाऱ्या एका संस्थेचे (Hope Project) काम जवळून बघितले होते. तेव्हा या लोकांना जीवनातल्या समस्यांचे निराकरण कसे करावे, त्यांना आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा द्यावा याबद्दल मला वारंवार विचार पडत असे. या सर्व लोकांचे आयुष्य उंचावण्यासाठी लागणारे आर्थिक साधन माझ्याकडे नाही, परंतु तत्त्वज्ञान क्षेत्रात माझ्या बौद्धिक कार्याच्या आधारे त्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे काही विचार आहेत. मी तेच सांगण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या करिअरवर किंवा माझ्या संशोधनात घालवलेल्या वेळेच्या तुलनेत मी माझ्या सामाजिक कार्यावर फार थोडा वेळ घालवला आहे. तरीही या लहान आणि तीव्र क्षणांचा माझ्या आयुष्यावर झालेला प्रभाव प्रचंड आहे. यामुळे मला सर्व बाजुंनी सामाजिक प्रश्न पाहण्याची आणि दिलेल्या समस्येचे कोणत्या प्रकारचे समाधान होणे शक्य आहे हे शोधण्याची संधी मिळाली. 

Bell Curve

बेल curve च्या आकडेवारीमध्ये आपण जगाची लोकसंख्या पाहिल्यास, रेषेच्या डावीकडील टोकाला 15% लोक आहेत जे आपले आयुष्य सांभाळण्यास असमर्थ आहेत. ते कार्य करण्यास प्रवृत्त होत नाहीत, कारण ते खूप घाबरून गेलेले असतात. दुसऱ्या उजवीकडच्या टोकाला जे  15% लोकं आहेत, त्यांच्या आयुष्यात शहाणपणा, चिकाटी आणि उपलब्ध साधनांमुळे भरभराट झालेली दिसते. या दोन टोकांच्यामध्ये असणारा जनसमुदाय जे अंदाजे 70% लोकसंख्येमध्ये गणले जातात, त्यांचे जीवन बऱ्यापैकी संतुलित असते. जीवन संतुलीत ठेवण्यासाठी काही युक्त्या त्यांना माहीत असतात, परंतु नेहमीच त्या युक्त्या सर्वाना लागू पडतील असेही नसते. मी अशी बरीच मध्यम-वर्गातील कुटुंबे पाहिली आहेत, जी अचानक मंदीच्या काळामध्ये किंवा त्यांच्या कुटुंबातील संकटांमुळे बरेच काही गमावून बसतात आणि हतबल होतात. कठीण समय येता कोण कामास येतो, या उक्तीप्रमाणे  जेव्हा आपण संकटात असतो, तेव्हा कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाकडे जायचे आणि कुठले उपाय शोधायचे, हे समजणे फार कठीण होते. म्हणूनच, आपल्या जीवनाचे समर्थन करणे आणि या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आंतरीक सामर्थ्य विकसित करणे नेहमीच महत्वाचे आहे.

ज्ञान योग, बुद्धीचा वापर, सकारात्मक दृष्टीकोन आणि जीवनाची चांगली समज आपल्याला जीवन जगण्यास आणि भरभराट करण्यास मदत करेल. यामुळे अधिक संधी निर्माण होतील, अधिक आनंद मिळेल आणि आयुष्यावर होणारे दुष्परिणाम कमी होतील. पुस्तकाच्या आणि ब्लॉगच्या प्रोजेक्टची ही पार्श्वभूमी होती, प्राचीन ज्ञानाचा आधुनिक समस्यांशी समन्वय करून त्या समस्यांचे निराकरण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. या प्रयत्नात सामील झाल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद!

© लेखिका : अश्विनी मोकाशी

Leave a Reply