Marathi Article

सेपियन्स आणि स्थितप्रज्ञ

श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार समजले जातात. त्यामुळे त्यांची आणि सेनेका या तत्त्वज्ञाची तुलना होऊ शकत नाही

‘सेपियन्स अ‍ॅण्ड स्थितप्रज्ञ’ या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आणि स्टॉइक तत्त्वज्ञ सेनेका (इ. स. पूर्व ४ – इ. स. ६५) याने मांडलेली तात्त्विक भूमिका अशा दोन पौर्वात्य व पाश्चिमात्य तात्त्विक विचारसरणींचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. हा अभ्यास एक आदर्श व्यक्ती कशी असावी, या संकल्पनेवर आधारित आहे. हे पुस्तक जरी नुकतेच प्रसिद्ध झाले असले, तरी हा अभ्यास २००२ मध्ये पुणे विद्यापीठात पीएच.डी.चा प्रबंध म्हणून मान्य झाला होता. त्याचाच हा सारांश. हे पुस्तक नव्याने प्रसिद्ध करण्यामागे दोन उद्देश होते : एक तर या अभ्यासाला उजाळा मिळावा आणि अन्य अभ्यासकांच्या नजरेत हे काम पडावे; त्याचप्रमाणे यात सांगितलेल्या गोष्टी आणि तत्त्वे जास्तीत जास्त लोकांना वाचण्यास मिळावीत व ही जीवनावश्यक मूल्ये आचरणात आणण्याची प्रेरणा मिळून लोकांना आपले जीवन जास्तीत जास्त सुखी-समाधानी आणि संतुलित जगण्याचा मार्ग दिसावा.

पहिल्या शतकात होऊन गेलेल्या सेनेका या रोमन तत्त्ववेत्त्याचे लेखन स्टॉइक परंपरेला अनुसरून तर होतेच; पण त्याची स्वतची विचारसरणी आणि शैलीही फार वाखाणण्याजोगी होती. गीतेच्या तत्त्वज्ञानात श्रीकृष्णाने खचलेल्या अर्जुनाला रणांगणावर केलेला उपदेश आणि क्रूर राजा नीरोच्या दहशतीखाली अतिशय वाईट परिस्थितीत जगणाऱ्या लोकांना सेनेकाने दिलेला सल्ला यात बरेचसे साधर्म्य आहे. सेनेका जरी व्यवसायाने नीरोचा सल्लागार होता, तरी त्याचे तत्त्वज्ञान आणि लिखाण हे सर्व समाजासाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी होते. श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार समजले जातात. त्यामुळे त्यांची आणि सेनेका या तत्त्वज्ञाची तुलना होऊ शकत नाही. परंतु गीतेतील दुसऱ्या अध्यायात सांगितलेली ‘स्थितप्रज्ञा’ची लक्षणे आणि स्टॉइक तत्त्ववेत्त्यांनी सांगितलेली ‘सेपियन्स’ची लक्षणे यात मात्र जरूर साधर्म्य आढळते.

कुठल्याही काळात जगताना कायम काही प्रश्न उभे राहतात. महत्त्वाचा प्रश्न असतो की, सुखी आणि समाधानी जीवन कसे जगावे? मग असे जीवन जगण्यासाठी आपले वागणे शिस्तबद्ध कसे असावे? सद्गुणांची जोपासना कशी करावी? विचारांती निर्णय कसे घ्यावेत? हे आणि असे उपप्रश्न डोळ्यांसमोर येतात. प्राचीन काळापासून अनेक विचारवंतांनी यावर बराच अभ्यास केला आणि एक समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी एका आदर्श व्यक्तीचे स्वरूप कसे असावे, हा विचार मांडला. त्यांचे विचार आज आधुनिक काळातही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात, हा विचार या पुस्तकात मांडलेला आहे.

पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा वरवर अगदी भिन्न वाटणाऱ्या संकल्पनांमध्ये साधर्म्य शोधून आपल्याला यातून काय शिकता येईल याचा विचार आपण केला तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. यासाठी कुठल्या धर्माचे, परंपरेचे किंवा धार्मिकतेचे बंधन न राहता, हा ज्ञानमार्ग सर्वाना उपलब्ध होतो. सुखाचा शोध आपण सगळेच जण सर्व काळ करत असतो; परंतु त्याचे उत्तर मात्र बऱ्याचदा आपल्या हातून निसटून जाते. कदाचित या तुलनात्मक अभ्यासाद्वारे त्याचे उत्तरही आपल्याला मिळू शकेल, अशी मी आशा करते.

 सेपियन्स

आदर्श व्यक्तीला ग्रीक आणि लॅटिन लेखक ‘सेपियन्स’ म्हणतात, तर संस्कृतमध्ये त्याला ‘स्थितप्रज्ञ’ म्हटले जाते. सेपियन्स या संकल्पनेची सुरुवात सॉक्रेटिस नावाच्या युगपुरुषापासून ग्रीक तत्त्वज्ञानात चालू झाली. लोक त्याला आणि त्याच्या विचारांना आदर्श मानायचे. त्याचा प्रभाव झेनो नावाच्या स्टॉइक विचारवंतावर होऊन त्याने आणि इतर स्टॉइक विचारवंतांनी त्यावर बरीच चर्चा आणि लेखन केले. सेनेका हा त्यांपैकीच एक. स्टॉइक तत्त्वज्ञांची परंपरा इ.स.पूर्व ३०० सालापासून इ.स. १८० सालापर्यंत चालू राहिली. त्यांनी- सद्गुणांद्वारे सुख कसे मिळवावे, हा विचार मांडला. खरे तर समाजामध्ये त्यांच्याबद्दल बरेच अपसमज, गैरसमज आहेत. त्यापैकी एक असा की, ‘स्टॉइकांना सुखशांतीपेक्षा अलिप्तपणा फार महत्त्वाचा वाटतो.’ पण असे नसून, ‘अलिप्त राहून आपल्याला सुखशांती कशी मिळवता येईल’ याबद्दल त्यांनी विचार मांडले. आता हा आदर्श माणूस कोण आणि कसा, तर तो सॉक्रेटिससारखा, शास्त्रांची जाण असलेला, विचाराने वागणारा, सद्गुणी, विचाराअंती निर्णय घेणारा, दुसऱ्याचाही विचार करणारा आणि विचारांवर सत्ता गाजवणारा विचारवंत, ज्याची वैचारिक सत्ता एखाद्या राजाच्या सत्तेसारखी अमर्याद असते. तो किंवा ती समाजाची धुरा वाहणारे असतात. त्यांचे वागणे-बोलणे अतिशय तर्कसंगत आणि सुसंबद्ध असते. त्यांचे विचार रूढी-परंपरा आणि तात्कालिक जनरीतींपेक्षा वेगळे असले तरी नीतिमत्तेला धरून असतात आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन त्यांच्याकडे असते, जे पटण्यासारखे असते. उदाहरणार्थ, जेव्हा महात्मा गांधींनी अिहसक पद्धतीने स्वातंत्र्याचा लढा द्यायचा ठरवला, तेव्हा त्याचे स्वरूप बाकी लढय़ांपेक्षा वेगळे पण समर्थनीय होते. मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांनी जेव्हा वंशवादाविरुद्ध अमेरिकी जनतेला जागृत केले आणि लढय़ासाठी प्रवृत्त केले, त्यातून त्यांची दूरदृष्टी दिसून आली. अशी इतिहासात बरीच उदाहरणे आढळतात. सॉक्रेटिस किंवा सेनेका यांना जेव्हा त्यांच्या विचारांसाठी आणि शिकवणीसाठी मृत्यूला सामोरे जावे लागले, तेव्हा ते धर्याने सामोरे गेले. अशी माणसे आयुष्यात चुकत नाहीत, त्यांच्याकडे पाहून आपल्याला दिव्यत्वाची प्रचीती येते आणि म्हणून ती अमर होतात.

पण हे करण्यासाठी त्यांना कुठला मार्ग चोखाळावा लागतो, याचे वर्णनही स्टॉइसिझममध्ये आणि सेनेकांच्या लेखनात आढळते. त्यासाठी सेपियन्सला किंवा अशा ज्ञानी माणसाला पुढील बाबींचा नेहमीच अंगीकार करायला लागतो. उदाहरणार्थ : जीवनाचे ध्येय समजून घेणे, स्वतचे भावविश्व समजून घेणे, स्वतची काळजी घेणे, सद्गुण अंगीकारणे, तटस्थ राहणे आणि तद्नुषंगाने योग्य वागणूक ठेवून सुखशांतीचा लाभ घेणे. याबरोबरच भावनांच्या आहारी न जाणे, तडकाफडकी निर्णय न घेता विचारांतीच निर्णय घेणे, योग्य विचार करून मगच योग्य कृतीला अनुमोदन देणे ही तत्त्वे नेहमी पाळावी लागतात. मौजमजा, प्रकृतिस्वास्थ्य, सौंदर्य आणि संपत्ती या गोष्टी वरवर सुखदायी समजल्या गेल्या असल्या, तरी स्टॉइक्स त्या गौण मानतात. तसेच इतर काही सर्वमान्य दु:खदायी गोष्टीही ते गौण मानतात. दारिद्रय़, व्याधींमुळे वा इतर काही सामाजिक त्रासामुळे खचून न जाता त्यांना गौण मानून, त्यांवर मात करून आपले जीवनकार्य नेहमी चालू ठेवावे असे ते मानतात.

ही जरी आदर्श व्यक्तीची लक्षणे असली तरी ही सर्वाना लागू पडतात आणि जेव्हा जेव्हा आपण ही मूल्ये आचरणात आणू, तेव्हा तेव्हा ती आपल्याला लाभदायकच ठरतात. या मूल्यांच्या अनुकरणाने आदर्श व्यक्ती नेहमीच सुखी, शांत आणि समाधानी राहते. पण आपण सगळ्यांनीच ही मूल्ये अंगीकारून जगण्याचा प्रयत्न केला तर आपण एक शांत आणि समाधानी जीवन जगण्यासाठीची वाटचाल करू हे निर्विवाद आहे.

स्थितप्रज्ञ

स्थितप्रज्ञ या संकल्पनेचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो तो उपनिषदांमध्ये. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान कृष्णांनी जी स्थितप्रज्ञ-लक्षणे सांगितली आहेत, त्यावरून आपल्या लक्षात येते की, स्थितप्रज्ञ व्यक्ती नेहमी स्वधर्माचे पालन करून कुशलतेने आपले काम चोख पुरे करते, जय-पराजय किंवा फायदा-तोटा याला सारखेच महत्त्व देते, आनंदाने हुरळून जात नाही वा दुखात होरपळून निघत नाही- दोन्ही समान मानून कशातही गुंतून राहत नाही. अशा वागण्याने ती व्यक्ती मन:शांती मिळवते. अशा व्यक्तीस अहंकाराऐवजी जगाच्या कल्याणास महत्त्व द्यावेसे वाटते. आपल्या सदसद्बुद्धीचा वापर करून अशी व्यक्ती ज्ञानयोगी होते आणि आपल्या सद्विचाराने व सत्कर्माने कर्मयोगी होते. कठोपनिषदात सांगितल्याप्रमाणे, ‘एखादा सारथी जसा रथ योग्य मार्गाने उचित ठिकाणी नेतो, त्याप्रमाणे आपल्या बुद्धीचे सारथ्य पत्करून आपले जीवनही आपण सुखी आणि समाधानी करू शकतो. ज्या व्यक्तीची बुद्धी स्थिर आहे, ती व्यक्ती स्थितप्रज्ञ असून अशी व्यक्ती मोक्ष मिळवते.’

तुलना

भगवद्गीता आणि सेनेकाचा स्टॉइसिझम या दोन्ही तत्त्वज्ञानांत खालीलप्रमाणे समान विचारधारा आढळतात : आदर्श व्यक्ती नेहमी विचारवंत आणि सद्गुणी असते. विचारांती निर्णय घेतल्यामुळे तिचा निर्णय योग्य असतो. तो निर्णय समजावून सांगण्याची पात्रता त्या व्यक्तीत असते. सद्विचार आणि सत्कर्म यामुळे त्यांच्या आचारात आणि विचारांत फरक नसतो. विचार व कृतीतल्या सुसंगतीमुळे त्यांची मनशांती ढळत नाही. सद्गुणी व्यक्ती नेहमी सत्कर्माची कास धरते, त्यामुळे त्यांच्यामध्ये देवत्वाची छटा दिसू लागते. सुख म्हणजे काय तर योग्य वेळेला योग्य विचार करून तो आचरणात आणणे. त्या न्यायाने सद्गुणी व्यक्ती ही नेहमीच सुखी व्यक्ती असते.

आता यात फरक काय आढळतो, हेही पाहू :

स्टॉइसिझमचा भर नीतिमत्तेचे पालन करून चांगले जीवन जगण्यावर आहे. गीतेमध्ये नीतिमत्ता तर सांगितली आहेच, पण त्यापुढे जाऊन मोक्षापर्यंत जाण्याचा विचारही आहे. योगस्थ, समाधिस्थ किंवा स्वधर्म या कल्पना सेनेकाच्या लेखनात आढळत नाहीत.

मग सेनेका कशासाठी?

मात्र, सेनेकाने भावनांचा निचरा करण्याची जी शिकवण दिली आहे, किंवा भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे सर्व लोकांना उपयोगी पडणारे विविध मार्ग सांगितले आहेत, ते आपल्याला इतरत्र क्वचितच आढळतात. उदाहरणार्थ ते म्हणतात की, क्रोधामुळे आपलेच नुकसान जास्त होते, म्हणून क्रोध न करता न्याय करावा, जेणेकरून स्वत:वर वा इतरांवरही अन्याय होणार नाही. गीतेमध्येदेखील क्रोधाने मनुष्याचा सर्वनाश होतो व तो कसा होतो, हा विचार मांडला आहे. दुखात बुडून न जाता सृष्टीचा निर्णय मानून अटळ घटनांचा स्वीकार करावा आणि कुठल्याही प्रकारे आपली बुद्धी ढळू देऊ नये.

आपल्या भावनांवर आपल्या विचारांचे नियंत्रण असते. आपले विचार बदलले तर आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. असा आधुनिक विचार जो मानसशास्त्रात आढळतो, तो सोप्या पद्धतीने सांगून सर्वसामान्यांना आदर्शपणाकडे कशी वाटचाल करता येईल आणि त्यामुळे लोकांची आणि समाजाची उंची कशी वाढेल, समाज कसा एकत्र येईल, याबद्दल समजून घेतले तर आपल्या सर्वानाच आयुष्य समजून घेऊन ते सुखी-समाधानी करणे कदाचित सोपे होईल.

‘सेपियन्स अ‍ॅण्ड स्थितप्रज्ञ’

लेखिका : अश्विनी मोकाशी

प्रकाशक : डी. के. प्रिंटवर्ल्ड प्रा. लि.

पृष्ठे: ३३ + १८७, किंमत : ८०० रुपये

https://www.loksatta.com/athour-mapia-news/ashwini-mokashi-book-sapiens-and-sthitaprajna-zws-70-1943055/