कोकिळेचं कुहू कुहू 

कोकिळेचं कुहू कुहू
लेखिका: अश्विनी मोकाशी
बाहेर खूप वर्षं राहिलं की नुसती बाकरवडीच मिळत नाही असे नाही. बरंच काही गमावलं जातं. एकदा माझ्या भावाशी फोनवर बोलताना हे अचानक लक्षात आले. त्या दिवशी त्याचे बोलणे कमी आणि कोकिळेचे जास्त ऐकू येत होते. त्या आवाजानेच मी एवढी मनोमन सुखावले की फोन ठेवावा असे वाटेना. माझ्या भावाला माझ्या भावनांचा थांगपत्ता नव्हता. कोकीळेच्या आवाजाची कलकल त्याला त्रासदायक वाटत होती. मला जाणवले, पुण्याच्या मातीचा सुगंध दुर्मिळ झाला होता, कोकिळेचं कुहू कुहू, चिमणीची चिव चिव किती दिवसात ऐकली नव्हती. या कोकिळेच्या तर मी प्रेमात पडले. किती मधुर सुंदर आवाज होता आणि किती ठसक्यात बोलत होती. आमचे बोलणे त्यापुढे फिके वाटत होते. कुठेतरी माझ्या मनात विचार जिरला की पुढच्या वेळी ही कोकिळा पुण्यात गेल्यावर प्रत्यक्ष ऐकायला मिळाली तर किती मजा येईल.
तशी वेळ यायला एक दोन वर्ष लागली. कारण अधेमधे पुण्याच्या भेटी अगदी उभ्या उभ्याच झाल्या. मग एकदा पावसाळ्यात भावाकडे राहिले असता ही कोकिळा, माझी जीवाभावाची सखी माझ्या खिडकीबाहेरच बसून कुहू कुहू करू लागली. अहो भाग्यम्. एक माझे स्वप्न अथवा माझी दुर्मिळ इच्छा म्हणा हवं तर, पण पुरी झाली.
पण तो आनंद तात्पुरता ठरला. लांबून तिचा आवाज ऐकताना तिच्या आवाजाची धार कधी जाणवली नव्हती. आता ती जाणवायला लागली. काही तासांनी तो आवाज कर्कश वाटू लागला. अजून काही तासांनी डोके धरून बसायची वेळ आली आणि मी डोकेदुखीचे औषध शोधू लागले.
मधेच एकदा दुपारी जाणवले की एक दोन तास झाले असतील कोकिळेचे बोलणे ऐकून. झोपली असावी बहुधा. हे पक्षी नक्की किती वेळ झोपतात. माणसासारखे आठ तास झोपू शकतात का फक्त एक दोन तास. इथे एकच कोकिळा राहते की एखादा थवा. आवाज तर इतका एकसारखा होता की एकाहून जास्त कोकिळ नसावी, असा विचार करून मी शांत झाले. आता माणसामाणसात फरक हा असतोच, मग तो कोकिळेच्या भावंडात पण असणारच. मग मी विचार केला की आपण पक्षांचा जुजबी अभ्यास पण कधी केला नाही, तर आता करावा. निदान रात्री तरी झोप मिळेल, का आत्ताच झोपून घ्यावं. मुले लहान होती तेव्हा ती झोपली की मी पण झोपून घ्यायचे, कारण परत कधी उठावे लागेल याचा नेम नसायचा.  पहिली पुण्यातील रात्र तर अशीच गेली होती कोकिळेच्या दोन आरोळ्यांच्या मधे डोळा लागला तर लागला. नाही तर टक्क जागी. मी इतकी थकले होते, त्यातून जेटलॅग. बारा भानगडी. झोप न मिळायला कारणे बरीच होती. कोकिळेवर मात्र पर्याय नव्हता. आजवरच्या आयुष्यात हा प्रश्न उद्भवला नव्हता. असा विचार करता करता किती वेळ गेला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शांतपणे चहा घेत होते आणि कप तोंडाशी नेणार इतक्यात परत दचकले आणि तात्काळ ताठ बसले. कोकिळबाईंनी परत एकदा मला साद घातली. ती अशी होती की मी आहे इथेच. फार सुस्तावू नकोस.
कधी नव्हे ते मी गुडघे टेकले. मी नुसताच आवाज ऐकला. दिसत तर कुठेही नव्हती ती कोकिळा. शेवटी मी ठरवले की हा कोकीळ पक्षी नर जातीचा आहे, मादी नाही. कदाचित त्याला गिधाड दिसले असेल. म्हणून घाबरून तो ओरडत असेल. नाहीतर इतके निष्ठुर कुणी असते का?
पाऊस धो धो पडतच राहिला. आता दुसरी रात्र अशीच निघून जाणार आणि उद्या सकाळ पर्यंत माझी विचार करण्याची ताकद पण संपून जाणार, या विचारातच मला डोळा लागला असावा. स्वप्नात कोकिळ पक्षाला गिधाडांना तोंड द्यावे लागले आणि त्यात गिधाडाने त्याला बजावले की ओरडू नकोस सारखा, थकल्या भागल्या लोकांना झोपू दे. जरा दया दाखव, अन्यथा मी तुला खाऊन टाकेन. असे म्हणत गिधाड झपाट्याने कोकिळावर चाल करून आले आणि कोकिळ पक्षाने जी आरोळी ठोकली की मी खडबडून जागी झाले. नशीब स्वप्न होतं. कदाचित हा पक्षी आडोशासाठी इथे येऊन राहिला असेल. भल्याभल्यांची या मुसळधार पावसाने वाट लावली. हा बिचारा पक्षी कुठे जाणार. माझी चलबिचल चालूच राहिली. हा पक्षी माझा वैरी का मित्र हे काही मला ठरवता येत नव्हते.
रात्रीतूनच पाऊस ओसरला. मी पण खिडक्या दारे सगळी नीट लावून घेतली. कानात बोळे घातले आणि निद्रादेवीची आराधना केली. माझे वैर पक्षाशी नव्हते, त्याच्या आवाजाच्या परिणामाशी होते.
कधीतरी झोप लागली आणि सकाळ झाली. जाग आल्यावर आधी पक्षाची चाहूल घेतली. काही पत्ता नव्हता कोकिळ नराचा किंवा मादीचा. मला चैन पडेना. म्हणून युट्यूब वर टाईप केले, कोकिळेचे कुहू कुहू आणि दिसलं तर काय, वसंतराव देशपांडे यांच्या मार्दवी आवाजात, त्यांनी केलेली कोकिळ पक्षाची याचना, ‘कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा, रात्री कधी गावू नको, सुकवू नको आपुला गळा, कुणी जाल का, सांगाल का.’ मी एकटी नव्हते तर हे सहन करणारी.
दुसरी रात्र तर माझी सरली होती. पाऊस थोडा थांबला होता. सकाळी चहा-कॉफी पण घेऊन झाली. तेवढ्यात लांबून सुमधुर आवाजात शीळ आली, कुहू कुहू आणि आमची मैत्री परत स्थानापन्न झाली. ओळखीचे हसू परत माझ्या चेहऱ्यावर विराजमान झाले.

Leave a Reply

Discover more from Ashwini Mokashi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading